महाराष्ट्र : शिक्षण विभागाकडून १४ जिल्ह्यांमध्ये ऊसतोड मजुरांच्या बालकांचे सर्वेक्षण सुरू

सोलापूर : यंदा एक नोव्हेंबरपासून राज्यात साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. राज्यात जवळपास १० लाख ऊसतोडणी कामगार आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांची लाखभर मुले फडातच आहेत. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था होऊ शकली नाही. आता महिनाभरानंतर, २४ नोव्हेंबरपासून शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आठ डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. शिक्षण विभाग १४ जिल्ह्यांमध्ये याबाबतचे सर्वेक्षण करत आहे. सर्व गावे, वाड्यावस्त्यांवर मुख्याध्यापकांच्या संनियंत्रणाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस हे प्रगणक म्हणून सर्वेक्षण करतील.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी १९ नोव्हेंबर रोजी हंगामी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. यात सोलापूरसह धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर हे स्थलांतरबहुल जिल्हे सहभागी आहेत. या जिल्ह्यांत मजुरांचे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत स्थलांतर होते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडत असतो. त्यामुळे या जिल्ह्यांत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here