पुणे : केंद्र सरकारच्या सूचनेनंतर ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५-२६ मध्ये १०४८ कोटी लिटर इथेनॉलच्या निविदा काढल्या. त्यामध्ये धान्यापासून निर्मित इथेनॉलसाठी ७६१ कोटी लिटर (७२ टक्के) आणि उसापासून निर्मित इथेनॉलसाठी २८९ कोटी लिटर (२८ टक्के) वाटा आहे. त्यामध्ये उसाच्या मळीपासून उत्पादित इथेनॉल पुरवठ्याचे प्रमाण वाढविण्याची साखर उद्योगाची मागणी आहे.
दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, राज्यातील मळीपासूनच्या इथेनॉलची निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता सुमारे ३१६ कोटी २० लाख लिटर्स इतकी आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राला १२० कोटी ७४ लाख लिटरचा कोटा मिळाला होता. राज्याच्या उत्पादन क्षमतेपेक्षा ऑईल कंपन्यांकडून इथेनॉलचा कमी कोटा प्राप्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर उसाच्या मळीपासूनच्या इथेनॉल खरेदीचा कोटा ऑईल कंपन्यांकडून वाढवून घेण्याबाबतचे धोरण आणण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील साखर उद्योगास गतवर्ष २०२४-२५ मध्ये ऑईल कंपन्यांना केलेल्या इथेनॉल पुरवठ्यातून ६ हजार ६२५ कोटी ७५ लाख रुपयांइतके उत्पन्न मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख यांनी दिली. ऑईल कंपन्यांना ऑक्टोबरअखेर १०४ कोटी ९९ लाख लिटर इथेनॉल पुरवठा कारखान्यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या ३८६.२० कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती क्षमता उभारणी झाली आहे. त्यापैकी मळीपासून ३१६.२० कोटी लिटर्स, मल्टीफीडपासून २०.३० कोटी लिटर्स आणि धान्यावर आधारित ४९.६५ कोटी लिटर्स इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. तसेच सध्या ६.६० कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती क्षमता प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांसह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आदी संघटनांनी कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे.

















