महाराष्ट्र : गाळप कालावधी घटल्याने कारखानदार चिंतेत, ऊस लागवड क्षेत्र वाढीसाठी वाढला दबाव

नारायणगाव : यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाहीत. उसाच्या पळवापळवी बरोबर उसाला तुरे जास्त आल्यामुळे आणि उसाचे वजन घटल्याने साखर कारखानेदेखील लवकर बंद झाले. गळीत हंगाम साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांनादेखील तोट्यात गेला. या गळीत हंगामामध्ये उसाचे एकरी उत्पादन अवघे ४० ते ४२ टन आल्याने गळीत हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला. साखरेच्या उताऱ्यावर देखील परिणाम झाला आहे. ऊस लागवड क्षेत्र कमी होऊ लागल्याने साखर कारखान्यांची चिंता वाढली आहे. आता पुढील गळीत हंगाम सुरू होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी असल्यामुळे ऊस लागवडीसाठी खास प्रयत्न करावे लागणार आहेत. पुढील वर्षी सर्वच साखर कारखान्यांना उसाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता आहे.

चालू हंगामात आडसाली व पूर्वहंगामी या उसाची देखील लागवड कमी झाली आहे. सध्या सुरू ऊस लागवडीचा हंगाम चालू असला तरी उन्हाची तीवता असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड जरी केली तरी उसाच्या उगवणीवर उन्हाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे ही लागवडदेखील कमी होत आहे. शेतकरी खोडवा ऊस काढून टाकत आहेत. याबाबत विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले की, पुढील वर्षी देखील उसाची कमतरता भासणार असल्याने शेतकऱ्यांनी जादा उसाची लागवड करावी, यासाठी शेती विभागाकडून विविध योजना राबविल्या जाणार आहेत. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाची लागवड जास्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी राखावा, यासाठी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विनंती केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here