महाराष्ट्र : साखर कारखान्यांवर डिजिटल वजन काटे बसविण्याची किसान मोर्चाची मागणी

पुणे : राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये उसाच्या वजनात फेरफार होण्याच्या तक्रारी सातत्याने येत आहे. काही ठिकाणी उसाच्या वजनात १० ते १२ टक्क्यांपर्यंत घट होत असून, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार तसेच ऊसतोड मजूर आर्थिक अडचणीत सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने हस्तक्षेप करून राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये शासनाच्या देखरेखीखाली स्वतंत्र डिजिटल वजन काटे बसवावेत, अशी मागणी किसान मोर्चाने केली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे -पाटील यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

किसान मोर्चाने साखर आयुक्तांना सन २०२६-२७ च्या गळीत हंगामापासून पारदर्शक डिजिटल प्रणाली लागू करावी अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासनाच्या नियंत्रणाखाली डिजिटल वजन काटे बसवावेत. वजन काटे थेट शासनाच्या मुख्य सर्व्हरशी ऑनलाइन जोडावेत. उसाच्या प्रत्येक गाडीचे वजन शासनाच्या नोंदीत उपलब्ध होईल, अशी प्रणाली उभारावी. यासाठी आमदार-खासदार निधी किंवा शेतकऱ्यांच्या संमतीने उसाच्या बिलातून नाममात्र कपात करून खर्च करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here