नागपूर : उसाच्या एफआरपीमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये मात्र वाढ केली जात नाही. केंद्र सरकारने साखरेची एमएसपी ४२०० रुपये प्रतिक्विंटल करावी, अशी मागणी माढ्याचे आमदार तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विधिमंडळात केली. चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगामामध्ये ३५०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पंढरपुरात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलक समाधान फाटे, बाळासाहेब जगदाळे व इतर सहकाऱ्यांची प्रकृती ढासळली आहे.
ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील म्हणाले, केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये वाढ केली आहे. परंतु साखरेचे दर गेले अनेक वर्षापासून जैसे थे आहेत. केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४२०० करावी. मागील काही महिन्यांमध्ये साखरेचा दर प्रतिक्विंटल ३८०० ते ३९०० रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, हंगाम सुरू झाल्यानंतर हा दर ३५०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. अशातच इथेनॉलचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखरेच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करावी, यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी आमदार पाटील यांनी केली.


















