मुंबई : राज्यात १८४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यापैकी पुण्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना, सहकार शिरोमणी वसंतराव काळे आणि गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या चार कारखान्यांनी गाळप परवाना न घेताच गाळप हंगाम सुरू केल्याचे समोर आले आहे. या कारखान्यांची १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीत दोषी आढळून येणाऱ्या कारखान्यांवर गाळप केलेल्या उसावर प्रति टन ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.
राज्यात आतापर्यंत १८४ कारखान्यांनी २७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांत ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात पहिली उचल न जाहीर करणे, एफआरपीची रक्कम १४ दिवसांत न देणे, अवसायानची कारवाई होऊन ही कारखाना सुरू करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडवर दोन वेळा अवसायनाची कारवाई झाली आहे. तरीही यंदा कारखाना सुरू करण्यात आला आहे. साखर आयुक्तांनी गोकुळसह मातोश्री शुगर्स, जयहिंद शुगर्स, श्री संत दामाजी कारखाना, सिद्धनाथ शुगर्स, धाराशिव शुगर्स, भीमा सहकारी कारखाना, भैरवनाथ शुगर आलेगाव आणि भैरवनाथ शुगर, लवंगी या दहा कारखान्यांना थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहे.
















