महाराष्ट्र : राज्यात अद्याप ३९६८ कोटी रुपये एफआरपी थकीत, कारखान्यांवर कारवाईसाठी शेतकरी संघटना आक्रमक

कोल्हापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अनेक कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. मार्चअखेर गाळप हंगाम संपेल, असा अंदाज आहे. काही मोजकेच कारखाने सध्या सुरु आहेत, तेही पुढील आठ ते दहा दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. गाळप हंगाम संपत आला असला तरी १५ मार्चअखेर राज्यातील तब्बल १५९ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ३९६८ कोटींची एफआरपी थकविल्याचे १५ मार्चच्या साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाळप करीत असलेल्या २०८ साखर कारखान्यांपैकी तब्बल १५९ कारखान्यांनी १५ मार्चअखेर पूर्ण एफआरपी दिलेली नाही. केवळ ४९ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे.

राज्यात १५ मार्चपर्यंत १०१५.८७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. या उसासाठी वाहतूक व हाताळणीसह एकूण देय एफआरपी (तोडणी वाहतूक खर्चासह) ३९,३२९ कोटी रुपये आहे. यापैकी ३५,३६१ कोटी रुपये (तोडणी वाहतूक खर्चासह) एफआरपी अदा करण्यात आली आहे. ४९ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली. ८६ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली. ४८ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. २५ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे.

शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तत्काळ दिली जावीत, यासाठी राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दुसरीकडे साखर आयुक्त कार्यालयानेही थकीत ऊस बिल प्रश्नी कारखान्यांच्या सुनावणी घेतल्या आहेत. आता एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालय काय कारवाई करणार ? याकडे शेकरी आणि शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here