महाराष्ट्र : राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे होणार वाटप

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गळीत हंगामात भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना गृहोपयोगी वस्तू संच देण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४ लाख लाभार्थ्यांना हे संच वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

राज्यातील साखर उद्योगात सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार कार्यरत आहेत. हे कामगार दरवर्षी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळासाठी स्थलांतर करून कारखाना परिसरातील मोकळ्या शेतांमध्ये उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपड्यांमध्ये राहतात. या काळात ते मूळ गावाहून अत्यल्प साहित्य घेऊन येत असल्याने स्वयंपाकासाठी आवश्यक भांड्यांची कमतरता भासते आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

ऊसतोड कामगारांचे राहणीमान उंचावून त्यांचे जीवन अधिक सुरक्षित व स्थिर व्हावे, यासाठी १३ सप्टेंबर २०१९ रोजी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून गृहोपयोगी वस्तू संच वाटपाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ लाख लाभार्थ्यांना संच वितरीत करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शासन मान्यतेनुसार संच देण्यात येतील. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजार लाभार्थी असून येथे सुमारे २५ कोटी रुपयांच्या भांड्यांचे वितरण होणार आहे.

गृहोपयोगी वस्तू संचामध्ये ३० वस्तूंचा समावेश या संचामध्ये एकूण ३० वस्तूंचा समावेश असून त्यात ताटे (४), वाट्या (८), पाण्याचे ग्लास (४), लहान, मध्यम व मोठे पातेले (झाकणासह प्रत्येकी १), भात वाढण्यासाठी मोठा चमचा, वरण/भाजीसाठी चमचा, २ लिटरचा पाण्याचा जग, मसाला डबा, विविध आकारांचे झाकणासह डबे (१४, १६ व १८ इंच), परात, ५ लिटरचा स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर, स्टील कढई, तसेच झाकणासह मोठी स्टील टाकी आदी साहित्याचा समावेश आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी संख्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १ लाख लाभार्थ्यांपैकी सर्वाधिक २५ हजार लाभार्थी बीड जिल्ह्यातील आहेत. परभणी व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी ५ हजार लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांतील लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे: बीड – २५,००० नाशिक – ११,४०० लातूर – ५,००० धाराशिव – १०,१०० छत्रपती संभाजीनगर – १०,००० नांदेड – ५,००० जळगाव – १३,४०० जालना – ८,४०० अहिल्यानगर – ६,७०० परभणी – ५,०००. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्येही लाभार्थ्यांच्या संख्येनुसार पुढील टप्प्यांत गृहोपयोगी वस्तू संचांचे वितरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here