पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात १५ डिसेंबर अखेर साखर उत्पादन ३१.३० लाख टन साखर झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे. देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा २५.०५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यात यंदा १९० साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. आतापर्यंत ३७९.३९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, साखर उतारा ८.२५ टक्के नोंदविला गेला आहे. यंदा उत्पादनात तब्बल १४.५० लाख टनांची वाढ झाली आहे.
देशात यंदा ४७९ कारखान्यांमार्फत आतापर्यंत ९०१. २७ लाख टन ऊस गाळप होऊन ७७.९० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १७.२० लाख टनांनी अधिक आहे. सरासरी साखर उतारा ८.६४ टक्के इतका असून, गेल्या हंगामापेक्षा तो किंचित जास्त आहे. देशातील गळीत हंगामाने डिसेंबर मध्यापर्यंत वेग घेतला आहे. ऊस उत्पादक प्रदेशातील बहुतांशी राज्यात अनुकूल हवामानामुळे तोडणी गतीने होत असल्याचे चित्र आहे. देशातील एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. दरम्यान उत्पादन उत्साहवर्धक असले तरी साखर कारखाने गंभीर आर्थिक तणावाखाली असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिली आहे.

















