पुणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा किमान तीन आठवडे आधीच राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होईल अशी चिन्हे आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यातच लवकर सुरू होणाऱ्या गाळप हंगामामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांना दिलासा मिळणार आहे. हंगाम निश्चितीसाठी २५ सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे. दरवर्षी राज्याच्या मंत्री उपसमितीच्या बैठकीत हंगामाची तारीख निश्चित करण्यात येते. महिना अखेरीलाच ही बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी १०.२५ टक्के, उताऱ्यासाठी ३ हजार ५५० रुपयांचा दर निश्चित केला आहे. त्यापुढील १ टक्क्यासाठी प्रत्येक टनाला ३४६ रुपये मिळणार आहेत.
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकांमुळे हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांनाही बसला. हंगाम लांबल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळल्याच्या तक्रारी झाल्या. तसेच कारखानदारांनाही ऊस नेताना कसरत करावी लागली. ऐन उन्हात मजुरांना ऊस तोडणी करावी लागली. टनेज घटल्याने कारखानदारांनाही काही प्रमाणात फटका बसला. यंदा दिवाळीच्या तोंडावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मात्र त्याचा हंगामावर फारसा परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. याबाबत श्री दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे म्हणाले की, यंदा साखर कारखाने लवकर सुरू झाल्याचा फायदा कारखानदारांसह शेतकऱ्यांनाही होणार आहे. साहजिकच उताराही चांगला मिळू शकतो. मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांकडून यंत्राने ऊसतोड करण्याकडे सध्या कल वाढतो आहे.