महाराष्ट्र : राज्यात २९ टक्के साखर उत्पादन वाढण्याचा राष्ट्रीय साखर महासंघाचा अंदाज

नवी दिल्ली : यंदा देशभरात चांगला पाऊस पडला. त्यामुळे साखरेचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा ३४५ लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकते. गेल्या वर्षी २९६ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा मोठ्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये साखर उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर राहणार आहेत. महाराष्ट्रात १३० लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ९३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा तब्बल २९ टक्क्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे असे अनुमान राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने काढले आहे.

महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा महासंघाने केला. याबाबत महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात यंदा उसाचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षी १३.८२ लाख हेक्टरमध्ये ऊस लावण्यात आला होता. यंदा १४.७१ लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली आहे. कर्नाटकमध्ये सहा टक्के लागवड क्षेत्र वाढले आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील ऊस लागवड क्षेत्रात पेरणीक्षेत्र तीन टक्क्यांनी घटले असले तरी उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातही पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here