महाराष्ट्र : राज्यातील सहा साखर कारखान्यांना एनसीडीसीकडून ७९८ कोटींचे कर्ज मंजूर

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) राज्यातील ६ साखर कारखान्यांना सुमारे ७९८ कोटी ४० लाख रुपयांइतके कर्ज मंजूर झाले आहे. त्यामध्ये कोल्हापूरमधील तीन आणि सांगली, अहिल्यानगर, बीडमधील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. एनसीडीसी’कडून कर्ज मंजूर झालेल्या कारखान्यांमध्ये श्री भोगावती सहकारी, करवीर – कोल्हापूर (११४ कोटी), श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, कोल्हापूर (२६७.८० कोटी), तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी, पन्हाळा-कोल्हापूर (१३९.६३ कोटी), क्रांती कुंडल डॉ. जी. डी. लाड सहकारी, पलूस – सांगली (७२.५६ कोटी), मुळा सहकारी साखर कारखाना, नेवासा- अहिल्यानगर (१८०.२० कोटी), लोकनेते सुंदरराव सोळुंखे सहकारी, धारूर-बीड (३०.२१ कोटी) यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील आणखी ८ साखर कारखान्यांचा सुमारे १,८५२ कोटी १४ लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव अद्याप ‘एनसीडीसी’च्या कर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ‘एनसीडीसी’ने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना सुमारे ४ हजार ३५५ कोटी रुपयांइतके कर्ज दिलेले होते. या कारखान्यांकडून कर्जाच्या विनियोगात गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांच्याकडील तपासणीत आढळला. त्याचा अहवाल देईपर्यंत एनसीडीसीने उर्वरित १४ साखर कारखान्यांच्या २,६५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कर्ज मागणीच्या प्रस्तावावरील कर्ज मंजुरीबाबत कोणताच विचार करण्यात आला नव्हता. साखर आयुक्तालयाच्या आयुक्तालयाच्या अहवालानुसार, त्यामध्ये गंभीरता नसल्याची बाब कळविण्यात आल्यामुळेच ‘एनसीडीसी’कडून परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या ६ साखर कारखान्यांना कर्ज मंजुरी देण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here