पुणे : मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदाचा २०२५-२६ चा हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील ३ आणि सोलापूर जिल्ह्यातील २ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप हंगाम सुरू करण्यात आल्याची गंभीर दखल साखर आयुक्तालयाने घेतली आहे. संबंधीत प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयाकडून या कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्याचा अहवाल साखर आयुक्तालयात आला आहे. त्यानंतर आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
या कारखान्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २७) दुपारी १२ वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती डॉ. संजय कोलते यांनी दिली. कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत आहे असे ते म्हणाले. विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनीही विनापरवाना गाळप सुरू केले. सरकारच्या नियमानुसार, हंगाम सुरू करण्यापूर्वी गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन केल्याचा अहवाल प्रादेशिक साखर सह संचालकांकडून आल्यानंतर दंडात्मक कारवाई प्रस्तावीत करण्यात आली आहे.











