पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील आघाडीच्या ओंकार ग्रुपने आता तेलंगणात दमदार प्रवेश केला आहे. तेलंगणा राज्यातील कोथुर (बी) (ता. जहीराबाद, जि. संगारेड्डी) येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक १७ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. ओंकार ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन करून हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव-बोत्रे पाटील म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगाचा खरा कणा आहेत. त्यांच्या अथक कष्टामुळेच साखर कारखाने सुरळीत चालतात आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत व सक्षम राहते. यंदा काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा तेलंगणातील कोथुर (बी) येथे ओंकार साखर कारखाना युनिट क्र. १७ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ ओंकार ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन करून करण्यात आला.
ऊस वेळेत गाळप होऊन त्यांना योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी ओंकार ग्रुप कटिबद्ध आहे. तांत्रिक मार्गदर्शन, वेळेत ऊसतोडणी वाहतूक तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवहार यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे ओमराजे बोत्रे-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, ओंकार साखर कारखान्याचे युनिट क्रमांक १७ हे चालू वर्षी कोथुर (बी) येथे सुरू करण्यात आले आहे. गळीत हंगामाला अधिकृत प्रारंभ झाला आहे. हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने ऊस वाहतूक सुरू केली आहे.
पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याकडे आला आहे. संगारेड्डी जिल्हा व आसपासच्या परिसरात मर्यादित साखर कारखाने कार्यरत असून, त्यामध्ये ओंकार साखर कारखान्यासह काही कारखान्यांमध्ये ऊस गळीत सुरू झाले आहे. ओंकार साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून त्यांना योग्य दर मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास ओमराजे बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, कारखाना परिसरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या प्रसंगी नरसिंह रेड्डी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















