पुणे : तमिळनाडूतील नामांकित साखर कारखान्यांच्या पुढाकाराने चेन्नई येथे दि. ८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए. आय.) आधारित ऊस शेती प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला ११ साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊस विकास अधिकारी उपस्थित होते. तमिळनाडू राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर लवकरच ए.आय. आधारित ऊस शेती प्रकल्प राबविला जाणार आहे. बारामतीचा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या प्रकल्पाच्या समन्वयाची जबाबदारी पार पाडणार आहे, असे ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेली चार वर्षे ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ हा प्रकल्प राबवत आहे. त्याला मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर आता इतर राज्यांत देखील हा प्रकल्प राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, बारामतीच्या, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे व डॉ. योगेश फाटके, तसेच ‘मॅप माय कॉप’ प्रतिनिधी राजेश शिरोळे व डॉ. भूषण गोसावी यांनी चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प तमिळनाडूमध्ये राबविण्यासंदर्भात चर्चा झाली. शेतकऱ्यांचा सहभाग, साखर कारखान्यांमार्फत प्रकल्पाला चालना देणे, भविष्यात शासकीय योजनांमार्फत प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे इत्यादी मुद्यांचा त्यात समावेश होता.












