महाराष्ट्र: एकरकमी ३,७५१ उचल देण्याची राजू शेट्टींची मागणी, कारखानदारांना १० नोव्हेंबरपर्यंत ‘डेडलाइन’

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी ‘स्वाभिमानी’च्या वतीने आयोजित २४ व्या ऊस परिषदेत आगामी लढ्याचे रणशिंग फुंकले. चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,७५१ रुपये पहिली उचल दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मागील तुटलेल्या उसाला एफआरपीपेक्षा जादा २०० रुपये अंतिम बिल देण्याची मागणी करण्यात आली. साखर कारखानदारांनी १० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २८ ऑक्टोबरला अमरावती ते नागपूर लाँगमार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर आयोजित ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नांदणीतील कार्यकर्ते हसन मुरसन अध्यक्षस्थानी होते. यावेळी शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि सरकार एफआरपीचे तुकडे पाडत असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी, रिकव्हरीतील चोरीवरही शेट्टी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, साधारणपणे ५००० टन ऊस गाळप करणारा कारखाना ५०० टन काटामारी करतो. दररोज १५ लाख रुपये काळा पैसा बाहेर काढतो. तोडणी वाहतूक खर्चात शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

ऊस परिषदेमध्ये अठरा ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये, काटामारी व उतारा चोरी रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा, साखरेची आधारभूत किंमत ३,१०० रुपयांवरून ४,५०० रुपये करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, सोयाबीन, भात, मका, नाचणी यांची हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करावीत आदी ठराव करण्यात आले. यावेळी डॉ. दीपिका कोकरे, पुरंदर पाटील, विजय रणदिवे, पोपट मोरे, अजित पोवार, अमर कदम, सूर्यभान जाधव, किशोर ढगे, प्रकाश पोफळे यांची भाषणे झाली. तानाजी वाठारे यांनी स्वागत केले. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेला सुभाष शेट्टी, डॉ. सुभाष अडदंडे, राजेंद्र गड्डुयाण्णावर, विक्रम पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here