पुणे : केंद्र सरकारने मळीआधारित आसवनींना साखर, साखरेचा पाक, उसाचा रस, बी- हेवी मळी, सी- हेवी मळी यापासून इथेनॉल निर्मिती बरोबरच धान्यापासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय २१ डिसेंबर २०२३ रोजी घेतला. त्यानुसार राज्य सरकारनेही हा निर्णय घ्यावा यासाठी ‘विस्मा’ आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाने पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून, राज्याच्या गृह विभागाने तसा शासन निर्णय बुधवारी (दि. २३) जाहीर केला आहे. राज्य सरकारनेही मळी आधारित आसवनी घटकांना (डिस्टिलरी) साखर, साखरेचा पाक, उसाचा रस, बी- हेवी मळी, सी-हेवी मळी यासह धान्यापासून दुहेरी स्त्रोत पद्धतीने (ड्युल फीड) जलरहित मद्यार्क- इथेनॉल निर्मिती करण्याबाबतच्या धोरणास मान्यता दिली आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे विशेषतः मका, भात व इतर धान्यांची खरेदी वाढून शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळण्यास मदत होईल. तसेच, डिस्टिलरीज वर्षभर चालण्यामुळे रोजगारात शाश्वतता मिळून साखर उद्योगाचे गाडे रुळावर येण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. याबाबत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारचा हा निर्णय साखर उद्योगाचे आर्थिक गणित स्थिरावणारा आहे. नव्या धोरणाने मका, भात व इतर धान्यांनाही मिळणार चांगला भाव मिळेल. साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी प्रकल्प बाराही महिने चालविण्याची संधी मिळणार असून रोजगारनिर्मिती वाढण्याबरोबरच कारखान्यांची पूर्ण क्षमताही वापरात येणार आहे.