मुंबई : आर्थिकदृष्ट्या आजारी आणि अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुनर्रचनेमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चारजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या किंवा अवसायनात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांसह त्यांची अन्य युनिट भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या बैठकीत, साखर कारखाने चालविण्यास देण्याबाबत निकष निश्चित करण्यात आले होते. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या विषयाला गती मिळाली आहे. आजारी आणि अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.


















