मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तरीही हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक ताणतणाव, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या सर्व घटकांचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत यासाठी विशेष कृती दल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचे कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे. मानसिक आरोग्य, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थैर्य आणि हवामान बदल यांचा एकत्रित विचार करून शेतकऱ्यांसाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जाणार आहेत.
याबाबत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी हे कृती दलाचे नेतृत्व, करणार आहेत. कृती दलात सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘शिवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर एकत्रित उपाययोजना राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
















