पुणे : साखर कारखान्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदल करणे गरजेचे आहे. आपल्या साखर कारखान्यात वर्ष २०३० पर्यंत संपूर्ण उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले. भवानीनगर (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये डॉ. कोलते बोलत होते. साखर कारखान्यामध्ये साखर निर्मिती करत असताना एआयचा वापर होत आहे. तसेच, ऊस उत्पादक शेतकरी एआय वापर करून उसाचे उत्पादन घेत आहेत. तशाच पद्धतीने साखर कारखान्यांनी आगामी काळामध्ये हॉवेस्टरच्या अर्थात यांत्रिक ऊस तोडणीच्या माध्यमातून जास्तीजास्त ऊस तोडणीसाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला.
साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे कौतुक करून त्यांचा अडचणीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. तसेच, टॉपच्या कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये ‘छत्रपती’चा समावेश होत असून, सध्याची सरासरीची १०.९८ टक्के रिकव्हरी चांगली आहे असे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, “छत्रपती कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना असून, या कारखान्याने राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सध्या कारखाना अडचणीमध्ये असला तरी ही अडचणींमधून कारखाना उभारी घेऊन पुन्हा उभा कसा राहू शकतो, हे राज्याला दाखवून देणार आहे. पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यवस्थापक प्रशांत हेगडे, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, माळेगावचे संचालक नितीन देसाई आदी उपस्थित होते.
















