कोल्हापूर : साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ८८८.८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे आणि ८२५.५९ लाख क्विंटल (८२.५ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी उतारा ९.२९ टक्के आहे. गेल्या हंगामात एकूण ८१.०४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. ५ फेब्रुवारीअखेर कारखान्यांनी ८२.५ लाख टन साखर उत्पादन करून मागील हंगामातील उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे. सध्या हंगाम शेवटच्या टप्प्यात असून पुढील काही दिवसात साखर कारखाने बंद होऊ लागतील. या पार्श्वभूमीवर राज्यात शिल्लक ऊस क्षेत्र, देय एफआरपी, संभाव्य साखर उत्पादन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) बैठक बोलाविली आहे.
साखर आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत राज्यातील गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत झालेले गाळप, राज्यात शिल्लक असलेले ऊस क्षेत्र, एफआरपीची स्थिती, गाळप परवाना अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी ‘विस्मा’, ‘व्हीएसआय’, कृषी विभाग, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, तसेच साखर उद्योगाशी संबधित अन्य संस्थांचे अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलाविण्यात आले आहे. ‘चीनीमंडी’शी बोलताना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले की, आतापर्यंतचा गाळप हंगाम व्यवस्थित पार पडला आहे. साखर उत्पादनाने मागील हंगामाचा टप्पा ओलांडला असला तरी राज्यातील शिल्लक उसाचे क्षेत्र आणि संभाव्य साखर उत्पादन याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीच्या माध्यमातून राज्यात यंदाच्या हंगामात किती साखर उत्पादन होऊ शकेल, याचा अंदाज बांधता येईल, असे डॉ. कोलते यांनी सांगितले. ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची आकडेवारी पाहता राज्यातील एकूण साखर उत्पादन ११७ ते ११८ लाख टन होईल. त्यापैकी साधारणपणे १० लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळविली जाईल, असा अंदाज ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना व्यक्त केला.

















