कोल्हापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम संपत आला असला तरी १५ फेब्रुवारीअखेर राज्यातील तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ४,६०१ कोटींची एफआरपी थकविल्याचे १८ फेब्रुवारीच्या साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. २०६ साखर कारखान्यांपैकी तब्बल १५७ कारखान्यांनी १५ फेब्रुवारीअखेर पूर्ण एफआरपी दिलेली नाही. केवळ ४९ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. १०० टक्के एफआरपी देण्यामध्ये 13 कारखान्यांसह कोल्हापूर विभाग आघाडीवर असल्याचे दिसते.
कोल्हापूर विभागानंतर 12 कारखान्यांसह सोलापूर विभाग दुसऱ्या तर पुणे आणि अहिल्यानगर विभाग प्रत्येकी 9 कारखान्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नांदेड विभागातील 4 तर छत्रपती संभाजीनगर विभागातील 2 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. तर अमरावती आणि नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप 100 टक्के एफआरपी देऊ शकलेला नाही. गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना तत्काळ एफआरपी मिळावी, यासाठी काही कारखान्यांना नोटीस बजावली होती. जे कारखाने एफआरपी देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांचावर भविष्यात दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत ८७०.११ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. या उसासाठी वाहतूक व हाताळणीसह एकूण देय एफआरपी (तोडणी वाहतूक खर्चासह) ३३,६९७ कोटी रुपये आहे. यापैकी २९,३८२ कोटी रुपये (तोडणी वाहतूक खर्चासह) एफआरपी अदा करण्यात आली आहे. ४९ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली. ५८ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली. ५८ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. ४१ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. या कालवधीअखेर कारखान्यांकडून ४,६०१ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.


















