कोल्हापूर : राज्यातील १७८ साखर कारखान्यांची एकूण गाळप क्षमता २०१५-१६ मध्ये सुमारे ६.८५ लाख टन प्रति दिन होती. ही क्षमता २०२५-२६ च्या हंगामात थेट १०.४५ लाख टनांवर पोहोचली आहे. जुन्या कारखान्यांनी अनाठायी क्षमता वाढविल्याने ते कारखाने अडचणीत आले आहेत. गेल्या दहा वर्षांत गाळप क्षमतेत पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी सरासरी १४५ ते १५० दिवस चालणारा साखर हंगाम २०२४-२५ मध्ये थेट १००-१०२ दिवसांपर्यंत सीमित झाला आहे. दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, वाढत्या गाळप क्षमतेच्या तुलनेत ऊस क्षेत्रात अपेक्षित वाढ न झाल्याने जादा क्षमतेचा फटका थेट साखर उद्योगाला बसला आहे. ऊसतोडणी यंत्रांमुळे सुरुवातीला गाळपाचा वेग वाढला, मात्र ऊस उपलब्धता कमी असल्याने अनेक कारखान्यांना क्षमतेइतके गाळप करता आले नाही.
यंदाच्या हंगामात फेब्रुवारीच्या मध्यालाच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले आहेत. यंदा अति पावसाने उसाची वाढ झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच पण अपेक्षेइतके गाळप करताना कारखान्यांच्या नाकीनऊ येत आहेत. अनेक कारखाने क्षमतेइतका ऊस गाळप करू न शकल्याने मोठ्या अडचणीत आहेत. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते शासनाने वेळीच काही सकारात्मक निर्णय घेतले नाहीत तर हे कारखाने चालवणे भविष्यात मुश्कील होऊन बसेल. कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवलेली गाळप क्षमता अडचणीची ठरली आहे. कारखान्यांनी गाळप क्षमतेत मोठी वाढ करताना कोणताही दीर्घकालीन आर्थिक विचार न केला नाही. कारखान्यांतील स्पर्धा, राजकीय प्रतिष्ठेची लढाई आणि दबावातून गाळप क्षमता वाढवली गेली. मात्र ऊस तेवढाच राहिल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.


















