पुणे : राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊस दरापोटी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. मात्र, ११ साखर कारखाने पूर्ण एफआरपी देण्यात अपयशी ठरले. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या ११ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कारवाई केली. यापैकी ६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले. तर १५ सप्टेंबरअखेर आरआरसी कारवाई केलेल्या ५ साखर कारखान्यांकडे २३ कोटी रूपये थकीत आहेत. इतर कारखान्यांकडे थकीत एफआरपीचा विचार केला तर एकूण ७२ कोटी रूपये कारखान्यांकडे थकीत आहेत. एकूण एफआरपी रक्कमेचा विचार केला तर ९९.८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली असून केवळ ०.२० टक्के रक्कम देणे बाकी आहे.
राज्यात २०२३-२४ हंगामात २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यामध्ये १,०७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले. एकूण ११० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चासह ३६,७५३ कोटी रूपये एफआरपी कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. यातील ३६,६८१ कोटी रूपये देण्यात आले आहेत. तर ७२ कोटी रूपये अद्याप कारखान्यांकडे बाकी आहेत असे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांमध्ये अक्कलकोटच्या (सोलापूर) मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड.लि., रूद्देवाडी, विठ्ठ्ल रिफाईंड शुगर्स लि, पांडे, ता, करमाळा, आदिनाथ सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा आणि दक्षिण सोलापुरातील जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगावचा समावेश आहे.