महाराष्ट्र : राज्यातील साखर उत्पादन २९ लाख टनांनी घटले, ऊस उत्पादनासह उताराही खालावला !

कोल्हापूर : राज्याच्या गळीत हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. राज्यात पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सगळ्यात जास्त दिवस चालले. यंदा राज्यातील उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्यात झालेली घटही उद्योगाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात २९ लाख टनाची घट झाली आहे. यंदाच्या साखर हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात ८०.९५ लाख टन साखर उत्पादन झाले. ऊस उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांचे सरासरी एकरी दहा ते पंधरा टनांपर्यंत घट झाल्याने नुकसान झाले आहे. सरासरी पन्नास ते साठ टनांवर येणारे उत्पादन ४० ते ४५ टनांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला आहे. राज्यातील ९२ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून वाहतूक खर्चासह एकूण ३२५३३ कोटी रुपयांच्या एफआरपीपैकी ३०,४५३ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. अद्याप १०८० कोटी रुपये एफआरपी येणेबाकी आहे.

गेल्यावर्षी राज्यात २०८ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यंदा २०० कारखाने सुरू राहिले. गतवर्षीच्या दुष्काळाचा फटका बसल्याने लागवड क्षेत्रातही मोठी घट दिसली. साखर कारखान्यांनी तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत ऊस तोडणी यंत्राचा वापर वाढवला. त्याचा फटका तोडणी मजुरांना बसला. हंगामाबाबत कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील डॉ. अशोक पिसाळ म्हणाले की, यंदा ऑगस्टमधील प्रतिकूल हवामानामुळे उसाचे तुरे लवकर आले, त्याच प्रमाणे ऊस उत्पादन वाढीसाठी थंड रात्र, उबदार दिवस हे चक्र राहिले नाही. पावसाच्या प्रमाणातही अनियमितता आल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम उसाचे उत्पादन घटण्यावर झाला. तर साखर उद्योग तज्ज्ञ डॉ. पी. जी. मेढे यांनी सांगितले की, यंदाचा हंगाम साखर उद्योगासाठी फारसा समाधानकारक गेला नाही. साखरेच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही. क्षमतेप्रमाणे उसाचे गाळप झाले नाही, यामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ झाली. साखरेच्या एमएसपीत वाढ नसल्याने चांगल्या दराने साखर विक्रीची चिंता कायम राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here