महाराष्ट्र : राज्यातील ऊस गाळपात यंदा ६६.४ टक्क्यांनी वाढ, पुणे विभागाची आघाडी

पुणे : गेल्या महिन्यापासून राज्याच्या सर्वच भागात पावसाने पूर्ण विश्रांती दिल्याने साखर हंगामाने गती घेतली आहे. राज्यात बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रांची मदत पहिल्या टप्प्यात घेतल्याने तोडणीची गती वाढल्याचे चित्र आहे. राज्यात गेल्या हंगामात २१ डिसेंबरअखेर २६८ लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यंदा याच कालावधीत ४४६ लाख टन गाळप झाले आहे. साखर हंगामाला गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ६६.४ टक्क्यांनी अधिक उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये पुणे विभाग सर्वाधिक १०९ लाख टन ऊस गाळप करून आघाडीवर आहे. गेल्यावर्षी २१ डिसेंबरअखेर २२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. तर यंदा या कालावधीत ३८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

यंदा मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला. राज्यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात हीच स्थिती होती. त्यामुळे उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झाली नाही. याचा प्रतिकूल परिणाम ऊस तोडणीवेळी दिसत आहे. यंदा अपेक्षेपेक्षा एकरी पाच ते दहा टनांपर्यंत ऊस उत्पादनात घट असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साखर उताऱ्यात मात्र कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. पहिल्या दीड महिन्यात कोल्हापूर विभागाने १० टक्के उतारा नोंदवत ९.८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पुणे विभागाने ८.७८ टक्के उताऱ्याने ९.६ लाख टन साखर तयार केली आहे. रम्यान, हवामानातील बदलामुळे राज्यातील बहुतांशी उसाला तुरे आले आहेत. यामुळे शेतकरी लवकरात लवकर ऊसतोड व्हावी यासाठी कारखाना यंत्रणेकडे पाठपुरावा करत आहे. कारखान्याने सांगून सुद्धा तोडणी यंत्रणांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here