पुणे : यंदाच्या हंगामात साखर आयुक्तालयाने १०२ सहकारी व १०५ खासगी मिळून २०७ साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १९१ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. त्यामध्ये ९५ सहकारी आणि ९६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. हंगामामध्ये आत्तापर्यंत ४४६ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर ८.५२ टक्के उताऱ्यानुसार साखरेचे ३८ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. सर्वाधिक ऊस गाळपातील पुणे विभागाची आघाडी तूर्त कायम आहे. या विभागातील ३० कारखान्यांकडून १०९.३४ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर ८.७८ टक्के उताऱ्यासह एकूण ९६ लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केलेले आहे.
साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. विभागात ३७ कारखान्यांकडून ९८.७९ लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. सर्वाधिक १० टक्के उताऱ्यानुसार ९८.७७ लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ४३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांनी आत्तापर्यंत ९४.६३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ७.६७ टक्के उताऱ्यानुसार ७२.६ लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. अहिल्यानगर विभागातील २६ कारखान्यांनी ५३.२३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्णकेले आहे. तर ७.९६ टक्के उताऱ्यानुसार ४२.३८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४४ लाख मे.टन, नांदेड ४३.८९ लाख मे.टन, अमरावती ४.६९ लाख मे. टन तर नागपूर विभागात जेमतेम तीन हजार मे. टनाइतके ऊस गाळप झाले आहे.

















