महाराष्ट्र : राज्यात हंगाम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीच्या मध्यापासून काही कारखान्यांचा हंगाम संपण्याची शक्यता

पुणे : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ऊसतोडणीचा वेग वाढल्याने यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासून काही ठिकाणचे साखर कारखाने हंगाम संपण्याची शक्यता आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सुमारे ८४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन सुमारे २० लाख टनांनी अधिक आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३१ टक्के आहे. गेल्यावर्षी हंगामात समान कालावधीत ६९७ लाख टन गाळप झाले होते. त्या तुलनेत आतापर्यंत २०० लाख टनाहून अधिक उसाची जादा तोडणी झाली आहे.

राज्यातील कारखान्यांची गाळप क्षमता १०,०४,३०० टन प्रतिदिन आहे. आतापर्यंत ऊस गाळप ९०६ लाख मे टन झाले आहे. साखर उत्पादन ८४ लाख टन झाले आहे. सध्या ज्या भागातील तोडणी आटोपत आली आहे, तेथील ऊस तोडणी मजूर आता जादा ऊस उपलब्ध असलेल्या कारखान्यांकडे वळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ऊसतोडणीला आणखी गती येण्याची शक्यता आहे. सध्याच्या ऊस तोडणीत हार्वेस्टरचा अधिकाधिक वापर होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून उसाला तुरा आला असून अशा उसाचे वजन घटल्याचे दिसून येत आहे. गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर कारखान्यांची धावपळ सुरू असून फेब्रुवारीअखेर हंगाम संपेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here