पुणे : राज्य सरकारने ऊस दर कायद्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या अभ्यास समितीचा विस्तार करण्यात आला आहे. आता यामध्ये सहकारी व खासगी कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. यामुळे आता समितीमधील सदस्यांची संख्या १३ झाली आहे. साखर आयुक्त डॉ. कोलते हे या समितीचे अध्यक्ष तर आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे सहसंचालक प्रकाश अष्टेकर हे सदस्य सचिव आहेत. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी याविषयीचा सुधारित आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र (साखर कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन अधिनियम २०१३ व नियम २०१६ अशा दोन्ही बाबींमध्ये कालसुसंगत सुधारणा सुचविण्याचे या समितीच्या विचाराधीन आहे.
ऊस दर कायद्यात सुधारणेसाठी साखर उद्योगाकडून आलेल्या नव्या सूचनांचा समावेश अभ्यास अहवालात केला जाणार आहे. समितीचा विस्तार करण्याची मागणी साखर उद्योगातून केली जात होती. समितीत साखर संचालक यशवंत गिरी (अर्थ) व डॉ. केदारी जाधव (प्रशासन), अर्थ सहसंचालक सचिन रावल, लेखापरीक्षण सहनिबंधक बी. एस. बडाख, साखर लेखापरीक्षक पी. ए. मोहोळकर यांच्याकडून सदस्य म्हणून सूचना दिल्या जाणार आहेत. शिवाय ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, अॅड. आनंद आकुत, सनदी लेखापाल शैलेश जैस्वाल यांनाही सदस्य म्हणून समितीत स्थान देण्यात आले आहे. तर समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनचे (विस्मा) कार्यकारी संचालक अजित चौगुले या दोघांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
















