महाराष्ट्र : कारखान्यांकडून इथेनॉलच्या नावाखाली साखर उताऱ्याची चोरी – ‘फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स’कडून साखर आयुक्तांकडे तक्रार

पुणे : ‘फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स’च्या ‘टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी’ ने साखर कारखान्यांकडून इथेनॉलसाठी ऊस गाळप करताना साखर उतारा चोरला जात असल्याची तक्रार केली आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञ गटाने केलेल्या या तक्रारीनंतर साखर आयुक्तालयाने याबाबत चौकशीसाठी पावले उचलली आहेत. उतारा चोरीतून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोरमच्या शिष्टमंडळाने अलीकडेच साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत चौकशीची मागणी केली. उतारा प्रमाणीकरणाची प्रक्रिया अर्धवट ठेवणाऱ्या व शेतकऱ्यांना सुधारित एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत ‘टास्क फोर्स’चे समन्वयक सतीश देशमुख म्हणाले की,आम्ही २०२२-२३ मधील गाळपातील उतारा चोरीचे मुद्दे पुराव्यांसह आयुक्तालयाकडे दिले होते. आता २०२३-२४ व २०२४-२५ मधील मुद्दे तपासण्याची जबाबदारी आयुक्तालयाची आहे. खरे तर सुधारित उताऱ्याबाबत व्हीएसआयचे प्रमाणपत्र प्रत्येक कारखान्याने जाहीर करावे. पारदर्शकतेसाठी इथेनॉल निर्मिती क्षमता, उत्पादन तक्ता दर वर्षी जाहीर करण्याची सक्ती आयुक्तालयाने कारखान्यांवर केली पाहिजे. कोणत्या साखर कारखान्याने किती ऊस इथेनॉलकडे वळवला, उतारा काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे (व्हीएसआय) या उसाचा तपशील पाठवला का, त्यात त्रुटी असल्यास तपासणी होते का, उतारा न तपासणाऱ्या कारखान्यांवर काय कारवाई केली जाते, अशी विचारणा त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here