अहिल्यानगर : ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साखर व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या साखर, दुग्धजन्य व अन्य मालाची निर्यातक्षमता वाढवण्यासाठी निर्यातदारांना प्रशिक्षित करत सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चर कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी घेतला. या बैठकीस महाव्यवस्थापक दीपक शिवदास, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी अशोक बेनके, श्याम बिराजदार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरचे प्रकाश गांधी, जागतिक बँक प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता अभय भांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यू. ए. बोरुडे, उत्पादन शुल्क विभागाचे प्रवीणकुमार तेली, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा, आमी संघटनेचे अध्यक्ष खाकाळ यांच्यासह उद्योगमित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना विदेश व्यापार महानिदेशालयामार्फत प्रशिक्षित करण्यात यावे. निर्यातीतील अडचणी सोडवण्यासाठी निर्यात मदत केंद्र उभारण्याचेही त्यांनी सूचित केले. प्रशासन व उद्योजकांच्या समन्वयातून निर्यात क्षमतेस चालना देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.