माळेगाव कारखाना रणधुमाळी : सत्ताधारी-विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु, तुल्यबळ उमेदवार निवडीवर भर

पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांच्या तुलनेत तुल्यबल आणि तरुण उमेदवार निवडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांचे प्रतिस्पर्धी व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे स्वतःच या निवडणुकीत पुन्हा उतल्याने दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सोमवारी (ता. २६) रोजी अजित पवार पॅनेलमधील संभाव्य उमेदवारांचा आढावा घेणार आहेत तर विरोधक दोन्ही तावरेंनी सहा गटांत उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

अजित पवार व त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचेही तालुक्यातील राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी माळेगावची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे पवारांचे नेतृत्व या कारखान्यावर १९९७ व २०१४ वगळता अनेक वर्षे अबाधित राहिली.चंद्रराव तावरे यांनी सत्ताधाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे. अजित पवार यांनीही विरोधकांना एकाकी पाडण्याची मोहीमच हाती घेतल्याचे दिसते. राष्ट्रवादीची पॅनेल निवड करताना विरोधकांची राजकीय कोंडी होईल, असे उमेदवार निवडण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

तावरेंनीही माळेगाव कारखान्यावरील दोन वेळा पवारांची सत्ता खाली खेचली आहे. त्यामुळे यंदाची माळेगावची निवडणूक या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे. या राजकीय प्रक्रियेत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान संचालक मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, सुरेश खलाटे, तानाजी पोंदकुले, संगीता कोकरे, पंकज भोसले, सागर जाधव यांचा समावेश आहे. माजी संचालकांमध्ये विलास देवकाते, रणजित खलाटे, रोहित जगताप, मनोजकुमार जगताप, ज्ञानदेव शिर्के, किरण आटोळे, किशोर पवार, माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे, अनिल वाघमोडे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here