पुणे : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण ५९३ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः शड्डू ठोकल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले. त्यामध्ये अजित पवार (ब वर्ग मतदार संघ), बाळासाहेब तावरे (माळेगाव गट), केशवराव जगताप, राजेंद्र जगताप (पणदरे गट), अनिल तावरे, प्रकाश तावरे (सांगवी गट), सतीश तावरे (माळेगाव गट), रामदास आटोळे (खांडज गट), पोपटराव गावडे (बारामती गट) आदींचा समावेश आहे. बाळासाहेब तावरे (वय ८३) यांनी सुमारे २८ वर्षे कारखान्याच्या संचालकपदावर काम केले, तर अध्यक्षपदावर ते जवळपास १७ वर्षे कार्यरत होते. केशवराव जगताप (वय ७८) हे दोन वर्षापासून अध्यक्षपदावर काम करीत आहेत. त्यांना संचालकपदाचा १७ वर्षांचा अनुभव आहे.
राजेंद्र जगताप यांना माळेगाव कारखान्यात अधिकारी म्हणून ३६ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे. त्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून ते तीन वर्षे कार्यरत राहिले. तसेच, विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे (वय ८५) हे ४५ वर्षापासून माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत. तसेच, रंजन तावरे (वय ७२) हे जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. सहा गटातून शेवटच्या दिवशी मंगळवारी दोनशे, तर एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माळेगाव गटातून आजवर ५१, पणदरे गटातून ७९, सांगवी गटातून ५४, खांडज-शिरवली गटातून ६६, नीरावागज येथून ५९, बारामती गटातून ७९, महिला राखीव मतदार संघातून ६८, अनुसूचित जाती-जमाती गटामधून २०, भटक्या जातीमधून ६४, इतर मागास प्रवर्गातून २५ आणि व वर्ग संस्था मतदार संघातून २८ उमेदवारी अर्ज आजवर दाखल झाले.
युवकांचे शक्तिप्रदर्शन…
माळेगाव कारखाना निवडणुकीत मातब्बर नेते मंडळींबरोबर युवा नेते योगेश जगताप आदींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बारामती निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता कोकरे, कार्यकर्ते प्रशांत सातव, अनिल तावरे, संग्रामसिंह देवकाते आदींनी उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल केले. पारंपरिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे आदींनीही या निवडणुकीत दंड थोपटले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुकांनीही अर्ज दाखल करीत निवडणुकीत चुरस वाढली.
२१ जागांसाठी ५९३ अर्ज
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी एकूण ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार गटासह अन्य दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील निवडणूक मैदानात उतरली आहे. माळेगाव गटातून ५१, पणदरे ७९, सांगवी ५४, खंडज- शिरवली ६६, निरावागज ५९, बारामती ७९, महिला राखीव ६८, अनुसूचित जाती जमाती वीस, भटक्या जमाती ६४, इतर मागास प्रवर्ग २५, ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन २८ अर्ज दाखल झाले आहेत. (दि. २८) उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दि. २९ मे ते १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. (दि.१३) जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.