पुणे : माळेगाव साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. सहकाराला दिशा देणाऱ्या या कारखान्याने राज्यातील २०० खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला उच्चांकी ॲडव्हान्स दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने निरावागज (ता. बारामती) येथील प्रचार सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले की, राज्यातील अनेक साखर कारखाने असे आहेत, जे २५०० रुपये प्रतिटन ऊसदर देतात. मात्र, माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊसदर दिला आहे. असे असताना विरोधक माझ्यावर सहकार मोडीत काढण्याचा आरोप करीत आहेत. मी सहकाराला बळकटी, ताकद आणि मजबुती देणारा आहे. त्यामुळे माझ्या आधिपत्याखालील माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाने हे सहकारातील उच्चांकी ऊसदर देणारे कारखाने म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी विरोधकांकडून कारखाना आपल्या ताब्यात आला, त्या वेळी विरोधकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारखाना चालविल्यामुळे शेवटच्या वर्षी साखर उतारा केवळ १०.६१ असा होता, तर आपल्या ताब्यात सोमेश्वर साखर कारखाना, श्री छत्रपती साखर कारखाना आहे. तुम्ही जर माळेगाव साखर कारखाना ताब्यात दिला, तर या तिन्ही कारखान्यांमध्ये कोण जास्तीची काटकसर करीत उच्चांकी ऊस दर देईल, याची स्पर्धा लावणार. तोच कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर विक्रमी गाळप करून पावणेबारा बारा टक्के साखर उतारा मिळविला. त्यामुळे शेतकरी सभासदांना सातत्याने अधिकचे पैसे देता आले. मी जर सहकार मोडीत काढायला निघालो असतो, तर तालुक्यातील सहकारी संस्था यामध्ये दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कामकाज पाहा. शासनाच्या माध्यमातून या सर्व संस्थांना मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. काही संस्थांच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभे केले आहेत. दूध संघाच्या माध्यमातून उपपदार्थांची निर्मिती करीत या संस्था अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या शब्दाला किंमत आहे. माळेगाव कारखान्याला २५० कोटी रुपयांचे आयटीचे पत्र आले होते, त्यातून कसा मार्ग काढला हे संचालक मंडळाला विचारा, असे म्हणत पवार यांनी बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा केला. यामध्ये रस्ते, पूल, रेल्वे मार्ग, पालखी मार्ग, एसटी स्टैंड, विमानतळ आदींबाबत सखोल विवेचन देत बारामती तालुक्याचा नावलौकिक वाढविण्याचे काम केल्याचा अभिमान असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. माळेगाव कारखान्याची संलग्न असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील अंतर्गत रस्ते जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून तयार केले. याबाबत संस्थेला एक रुपयाची तोशीस लागू दिली नाही, असे पवार यांनी सांगितले. आपण एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेळेची, पाण्याची आणि पैशाची बचत करीत ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे या निवडणुकीत श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमताने विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले.