माळेगाव : खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण करून अधिकाधिक ऊस गाळपासाठी आमचा आग्रह धरणार आहे. सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायम ठेवण्यासाठी ‘माळेगाव’चे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा कारखान्याचे विरोधी गटाचे संचालक चंद्रराव तावरे यांनी दिला. माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल पराभूत झाला. या पार्श्वभूमीवर सहकार बचाव पॅनेलची सांगवी येथे आभार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
तावरे म्हणाले की, कारखान्याच्या निवडणुकीत पैसे घेऊन लाचार झालेल्या काही सभासदांनी चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आमचा पराभव झाला. परंतु, सात हजारांपेक्षा अधिक प्रमाणिक सभासदांनी या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला. त्यांच्या जोरावर यापुढेही सभासदांच्या भल्यासाठी लढत राहणार आहे. कारखाना सध्या साडेसात ते आठ हजार टन क्षमतेने प्रतिदिनी उसाचे गाळप करतो. परंतु बारामती ॲग्रो, दौंड शुगर, आंबालिका आदी खासगी कारखाने सुमारे २० हजार टनांपेक्षा अधिक गाळप करतात. त्यांची डिस्टलरी मोठी आहे. ऊस दाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कारखान्याचे विस्तारिणकर झाले पाहिजे यासाठी संघर्षाची आम्ही तयारी ठेवली आहे. यावेळी, जी. बी. गावडे, युवराज तावरे, रोहन कोकरे, विठ्ठल देवकाते, सतीश घाडगे, शिवाजी गावडे, धनंजय गवारे, राजेश देवकाते, रोहित जगताप, अॅड. श्याम कोकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष केले.