कोल्हापूर : कागलमधून इथेनॉल घेऊन गोव्याच्या दिशेने निघालेल्या टँकरला टायर फुटल्याने भीषण आग लागल्याची घटना साळवण ते मार्गेवाडीच्या वळणावर मंगळवारी सायंकाळी घडली. टँकरमध्ये सुमारे ४० हजार लिटर इथेनॉल होते. फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती. टँकरच्या चाकाचा टायर फुटून घर्षणामुळे पेट घेतल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच टँकर चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवले व १०१ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. यानंतर मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील फायर ब्रिगेडची वाहने तसेच छत्रपती शाहू साखर कारखान्याची फायर ब्रिगेड वाहने घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठमोठे धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
















