पश्चिम महाराष्ट्रात १०० हून अधिक साखर कारखाने बंद, यंदा उत्पादन घटण्याची शक्यता

सातारा : राज्यातील पश्चिम महाराष्ट्राचा विभाग हा साखरेचे आगार मानला जातो. या विभागातील सातारा जिल्ह्यात १७, सांगलीत १६, कोल्हापूर २३, पुणे १६ आणि सोलापूर जिल्ह्यात ३७ कारखाने आहेत. या एकूण १०९ कारखान्यांमधून दरवर्षी कोट्यधी क्विंटलचे साखर उत्पादन होते. राज्यातील जवळपास ५० ते ७० टक्के साखर ही याच विभागातून तयार होते. मात्र, यंदा उसाचे लागवडीखालील क्षेत्र घटल्याने फेब्रुवारीतच कारखाने बंद झाले आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपणारा गळीत हंगाम यंदा फेब्रुवारीतच संपवण्याची वेळ येऊन ठेपली. सद्यस्थितीत या पाच जिल्ह्यांतील १०० हून अधिक कारखाने बंद झाले आहेत. यातून साखर उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र कमी झाल्याने लवकर कारखाने बंद करण्याची वेळ आली होती. आताही तशीच स्थिती आहे. त्यात अनेक कारखानदारांनी गाळप क्षमता मोठया प्रमाणात वाढवली आहे. उस क्षेत्र कमी झाल्याने अनेक कारखान्यांच्या दैनंदिन गाळपावरही परिणाम झाला आहे. अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नसल्याने कारखान्यांच्या साखर उताऱ्यावर परिणाम झाला. पुणे व सोलापूर वगळता इतर तीन जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी ३,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर जाहीर केला. मात्र, अनेक कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही. शेतकऱ्यांचे एफआरपीकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here