कोल्हापूर : सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी अधिकाधिक अडचणीत येत आहे. साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी साखरेची एमएसपी ४२ रुपये करावी व इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर किमान ५ रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी कुंभी-कासारी सह. साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कारखान्याचा २०२५-२६ या वर्षाचा गळीत हंगाम समाप्ती झाली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याने चालू हंगामात ४,८८,८७० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ६,१५,३५० क्विं. साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याचा साखर उतारा १२.५५ टक्के इतका राहिला. यंदा पावसामुळे उभ्या उसावर आलेला फुलोरा तसेच उसाची खुंटलेली वाढ याचा पिकावर विपरीत परिणाम झाला अशी माहिती यावेळी देण्यात आली.
चेअरमन नरके यांनी कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५६० रुपये प्रमाणे ऊसबिल अदा केले असून, उर्वरित अंतिम टप्प्यातील बिले लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले. हंगाम समाप्तीवेळी आयोजित पूजा ज्येष्ठ संचालक बळवंत दादू पाटील-करचे व मंगल पाटील-करचे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक अॅड. बाजीराव शेलार, डॉ. बी. बी. पाटील, उत्तम वरुटे, विलास पाटील, अनिल पाटील, दादासो लाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील यांच्यासह कामगार प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


















