नांदेड : जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. उसाची उपलब्धता मुबलक असतानाही गाळपाचा वेग अत्यंत संथ आहे. सध्या कारखान्यांनी मिळून सुमारे ५२ लाख टन उसाचे गाळप केले असले, तरी अजूनही लाखो टन ऊस शेतात उभा आहे. तोडणीच्या तारखा वेळेवर न मिळाल्याने शेतकरी कारखान्यांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. साखर कारखान्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतांमध्ये वेळेत ऊस तोडणी न झाल्याने उसाला तुरा येऊ लागला आहे. उसाला तुरा आल्यास ऊस हलका होतो आणि साखरेचा उतारा घटतो. परिणामी कारखान्याकडून दर कपात होते. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो. कारखान्यांनी गाळप यंत्रणा तातडीने सुधारावी अशी मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात सध्या ऊस तोडणी मजुरांची कमतरता, वाहतुकीचा अभाव आणि कारखान्यांचा ढिसाळ कारभार यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गाळपाचा वेग तातडीने वाढवला नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान अटळ असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. वेळेवर ऊस उचलला नाही, तर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा ठाम इशाराही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे. तुरा आल्यानंतरही उशीरा तोडणी झाल्यास उसाचे वजन व साखर उतारा घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा कारखान्यांच्या दुर्लक्षामुळे वाया जाणार का, असा सवाल आहे. कारखान्यांच्या निष्काळजीपणाने ऊस पिक हातातून जात असल्याचे दिसून आल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.

















