नांदेड : नांदेड विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२५-२६ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप सुरू केले आहे. यात १९ खासगी तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. सध्या विभागात गाळपाला गती आहे. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारीअखेर २९ साखर कारखान्यांनी ६८ लाख ४६ हजार २७१ टन उसाचे गाळप केले. तर ५९ लाख ९६ हजार ८९० क्विंटल साखरचे उत्पादन घेतले आहे. विभागात खासगी साखर कारखान्यांनी ऊस गाळपात आघाडी घेतली आहे असे दिसून येते.
विभागात यंदा लातूर जिल्ह्यातील ट्वेंटीवन शुगर लि., माळवटी (जि. लातूर) या खासगी कारखान्याने चार लाख ६८ हजार ४१७ टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि., माखणी या खासगी कारखान्याने आजपर्यंत चार लाख ४९ हजार ६३० टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली. त्यापाठोपाठ तर ट्वेंटीवन शुगर, सायखेडा (ता. सोनपेट) कारखान्याने चार लाख चार हजार ३७५ टन उसाचे गाळप केले. विभागाचा सध्या साखरेचा सरासरी उतारा ८.८२ टक्के आहे. या विभागात सर्वाधिक १२ साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. यात सहा खासगी तर सहा सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी सहा कारखाने सुरू झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पाच साखर कारखाने सुरू आहेत.
















