नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन लाख टन ऊस यंदा कार्यक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांनी पळवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव साखर कारखाना आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड हे चार तालुके आहेत. ‘भाऊराव’चे येळेगाव व डोंगरकडा (ता. कळमनुरी) कारखाना असे दोन कारखाने आहेत. चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन लाख मेट्रिक टन ऊस नांदेडसह मराठवाड्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी पळविल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता उसाचे पैसे मिळण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
भाऊराव कारखान्याचे येळेगाव व डोंगरकडा येथील दोन्ही कारखान्यांची दररोजची गाळप क्षमता साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टन आहे. यंदाच्या गाळप हंगामात सहा लाख ४२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याला ऊस देऊ नका, असे वारंवार आवाहन केले. कारखान्याने संचालकांना इतर कारखान्याला जाणारा ऊस थांबविण्यासाठी सूचना केल्या. मात्र १४ ते १६ महिने झाले तरी ऊस जात नाही व चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस दिला. आता त्यांची कोंडी झाली आहे.