अर्धापूर : नांदेड जिल्ह्यात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काही महिन्यांपूर्वी चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला. कारखान्याचे कार्यक्षेत्र नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर या तालुक्यांत आहे. आगामी काळात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हेक्टरी ऊस उत्पादकता वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. ऊस लागवड हंगामात एआय तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी दिली. कारखाना क्षेत्रात दोनशे एकरवर एआय या तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कारखान्याचे येळेगाव व डोंगरकडा (ता. कळमनुरी) असे दोन युनिट कार्यरत आहेत. यात उसाची प्रति हेक्टरी ऊस उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी बारामती येथील कृषी संशोधन केंद्राचे एक सॉफ्टवेअर लावले जाईल. ज्या शेतात ऊसाची लागवड केली आशा शेतात एक डिव्हाईस लावण्यात येणार आहे. त्यामुळे खतांची मात्रा, पाण्याचे प्रमाण, मातीतील सूक्ष्म घटक, एनपीके या बाबत माहिती मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ३० ते ४० टक्के ऊसाचे उत्पादन वाढेल. यावेळी कारखान्याचे संचालक व्यंकटराव कल्याणकर, प्रा. कैलास दाड, कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांसह पिंपळगाव येथील शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते.