नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची येळेगाव देगाव व डोंगरकडा (ता कळमनुरी) असे दोन युनिट सुरू आहेत. कारखान्याने एक नोव्हेंबरपासून ते १५ डिसेंबर या कालावधीत कारखान्याच्या युनिट क्रमांक एक व दोनमध्ये एकूण २,०४,७६१ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. कारखान्याने गेल्या गाळप हंगामात उसाला कराराप्रमाणे एफआरपीनुसार तीन टप्प्यांत भाव दिला होता. तर यंदा कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन २,४०० रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ४९ कोटी १४ लाख २७ हजार ८१९ रुपये जमा करण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी दिली.
अध्यक्ष चव्हाण म्हणाले की, यंदाच्या हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. कारखान्याच्या येळेगाव-देगाव येथील युनिट एकमध्ये १,२६,२१३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. तर डोंगरकडा युनिटमध्ये ७८,५४७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. दोन्ही युनिटचे एकूण गाळप २,०४,७६१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. कारखान्याच्या दोन्ही युनिटमध्ये गाळप करण्यात आलेल्या उसाला प्रतिटन २४०० रुपयांची पहिली उचल देण्यात येत आहे. कारखान्याच्यावतीने ४९ कोटी १४ लाख, २७ हजार ८१९ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार आहेत, असे ते म्हणाले. यावेळी कार्यकारी संचालक एस. आर. पाटील, ज्येष्ठ संचालक व्यंकटराव कल्याणकर, मारोतराव गव्हाणे मारोतराव तिडके, राजू कल्याणकर आदी उपस्थित होते.

















