परभणी : सायखेडा येथील ट्वेंटी वन युनिट टू साखर कारखान्याने उर्वरीत २०० रुपये प्रति टन हप्ता तत्काळ अदा करावा या मागणीसाठी कारखान्याच्या परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने २०२५-२६ यावर्षी हंगाम सुरू करण्यापूर्वी दर घोषित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना २,७०० रुपये दर देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांनी ऊस गाळपास आणला. मात्र, कारखाना प्रशासनाने प्रत्यक्षात २५०० रुपये प्रतिटन ऊस दर देऊन बोळवण केली आहे. त्यामुळे आधी गेल्या वर्षीचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत आणि यंदाचाही दर जाहीर करावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने आम्ही यावर विचार करू, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आम्ही २८ सप्टेंबरपर्यंत वाट पाहू. पैसे नाही दिले तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा दिला.