नांदेड : आम्ही बारामतीजवळच्या माळेगाव साखर कारखान्यामध्ये उसाला प्रतिटन ३४५० रुपये भाव दिला. जे आम्ही करू शकतो, ते इथले लोक का करू शकत नाहीत, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. उमरी आणि देगलूर येथील पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पवार नांदेड जिल्ह्यामध्ये होते. जिल्ह्याचे प्रमुख नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या येळेगाव आणि डोंगरकडा येथील प्रकल्पांमध्ये यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला. त्यांच्या कारखान्याने मांजरा कारखान्याप्रमाणे ३१५० रुपये दर द्यावा अशी मागणी आमदार चिखलीकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
अजित पवार यांच्यासमोर बोलताना आमदार चिखलीकर यांनी उमरी येथे खा. चव्हाण यांना ऊस दरावरून प्रश्न विचारले. ६० कोटींमध्ये उभारलेला कारखाना ४०० कोटींच्या तोट्यात कसा गेला, असा सवालही त्यांनी केला. लातूरच्या मांजरा कारखान्याने यंदाचा किमान भाव प्रतिटन ३१५० रुपये राहील, असे जाहीर केले आहे. पण अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने भाव न जाहीर करताच यंदाचा हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे पवार यांनी आमच्या कारखान्याने दिलेला दर मला सांगावा लागत असल्याचे नमूद केले. इथल्या लोकांना तसे का जमू शकत नाही अशी विचारणा पवार यांनी केली.












