नांदेड : बळिराज शुगर्स व जी-७ खासगी साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू झाले आहे. तरी खासगी साखर कारखान्यांनी पहिली उचल व एफआरपी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसाला ४,००० रुपये प्रतिटन दर द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. याबाबत संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन देण्यात आले. खासगी साखर कारखान्यांच्या वजन काट्याची नियमित तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
किसान सभेचे ओंकार पवार, सुरेश इखे, चंद्रशेखर साळवे, माधव शिंदे, अमीन तडवी पठाण आदींनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना प्रशासन यांच्यात बैठक आयोजित करून दराबाबतचा प्रश्न निकाली काढावा. दोन्ही तालुक्यांतील खासगी साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, उसाला किमान ४,००० रुपये प्रतिटन दर द्यावा, कारखान्यांच्या उसाच्या रिकव्हरीवर निश्चित करण्यात येतो. त्यामुळे ऊस रिकव्हरीची चोरी थांबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


















