नांदेड : श्री सुभाष कारखान्याचे यंदा पावणेसहा लाख टन ऊस गाळप शक्य – कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख

नांदेड: श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, वाघलवाडा, डोंगरकडा, डेक्कन व वारंग्याजवळील गूळ पावडर कारखान्याने सर्व मिळून एकंदरीत एक लाख टन ऊस या कार्यक्षेत्रातून नेल्याने या कारखान्याचे सात लाख टन ऊस गाळपाचे जे उद्दिष्ट होते ते पूर्ण होऊ शकले नाही. आतापर्यंत कारखान्यात पाच लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्यात १५ मार्चपर्यंत पाच लाख ७५ हजार टन ऊस गाळप होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी दिली. कारखान्याने सुरवातीला २, ७५१ रुपये प्रतिटन, तर १५ फेब्रुवारीपासून २,८५१ रुपये प्रतिटन भाव दिला. मार्चमधील उसाला २,९५१ रुपये प्रतिटन भाव दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे चेअरमन सुभाषराव देशमुख यांनी सांगितले की, श्री सुभाष’ आणि ‘शिऊर’ हे दोन्ही कारखाने टिकवण्यासाठी आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेजारील इतर कारखान्यांना ऊस देऊ नये. यापुढेही या भागातील शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस गाळपासाठी देऊ नये. श्री सुभाष कारखाना वर्ष २०२०-२१ मध्ये सुरू केला. प्रेसमडपासून सीएनजी तयार करण्याचे काम प्रस्तावित असून, कारखान्यावर वर्ष २०२२ मध्ये विद्युत तयार करण्याचे टर्बाइन सुरू केले. आतापर्यंत तीन कोटी १५ लाख युनिट वीज तयार केली असून, कारखान्याने संपूर्ण वीज वापरून एक कोटी ७५ लाख युनिट एमएसईबीकडे वर्ग केल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here