नांदेड : खतांच्या किमती, मजुरी आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ऊस शेती आता तोट्याची ठरत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने गावपातळीवर शेतकरी जनजागृती मोहिमेला प्रारंभ केला आहे. शनिवारी (ता. २४) वसमत तालुक्यातील हयातनगर येथे संघटनेतर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. चालू गळीत हंगामात उसाला योग्य भाव मिळावा आणि घामाचे दाम शेतकऱ्यांच्या पदरात पडावे, यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
उसाला एकरकमी एफआरपी आणि वाढीव बोनस मिळावा, ऊस वजनामध्ये होणारी फसवणूक थांबवण्यासाठी काटेकोर पावले उचलणे, गेल्या हंगामातील थकीत ऊस बिले व्याजासह द्या अशा मागण्या करण्यात आल्या. हयातनगर येथील जनजागृती मोहीम बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. शिवश्री भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जुनैद पठाण, अंकुश कोरडे, निवृत्ती सवंडकर, बालाजी ढवळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या गावोगावी जाऊन कोपरा सभा घेत आहेत. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी गावोगावी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. समाधानकारक ऊस दराच्या घोषणेपर्यंत जनजागृती मोहीम सुरू राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
















