नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा प्रक्रिया सरकारने राबवली. हा साखर कारखाना २० वर्षे चालवण्यासाठी कोल्हे कारखान्याच्या ताब्यात देण्यात आला. २ सप्टेंबरला निविदा उघडण्याची प्रक्रिया करण्यात आली. यासाठी राज्यातून ४ निविदा दाखल झाल्या. यात तीन निविदा कोल्हे साखर उद्योग समुहाच्या होत्या. तर एक निविदा दिंडोरी तालुक्यातील एका शेतकरी प्रक्रिया उद्योग संस्थेची होती. ती निविदा प्रक्रियेच्या नियमात न बसल्याने शासनाने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची निविदा मंजूर केली. आता कारखाना त्यांच्या ताब्यात चालविण्यास देण्यात आला आहे.
निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या स्व. अशोकराव बनकर सहकारी पतसंस्थेने पंधरा वर्षांसाठी रासाका ताब्यात घेतला. तीन वर्षांच्या गळीत हंगामानंतर बनकर यांच्या संस्थेने तो एक वर्ष बंद ठेवला. त्यानंतर हा कारखाना चालविण्यास आपण असमर्थ आहोत, असे सांगत फेरनिविदा काढाव्या, असा अर्ज त्यांनी शासनाकडे व साखर आयुक्तांकडे केला होता. त्यानुषंगाने शासनाने फेरनिविदा काढत रासाकासाठी नव्याने निविदा मागितल्या होत्या. यात कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने यात बाजी मारली. दरम्यान, रासाकाचे ११ कोटी ८५ लाख रुपये भाडेपट्टा थकविणाऱ्या आमदार बनकर यांच्या संस्थेकडून थकीत रक्कम मिळणार का? असा सवाल ऊस उत्पादक व सभासद व्यक्त करत आहे. भाडेपट्टा रक्कम जर मिळणार नसेल तर कारखाना भाडेपट्ट्याने देऊन काय उपयोग, त्यामुळे रासाका परत सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी होत असताना शासनाने व साखर आयुक्त प्रशासनाने कोल्हे साखर कारखान्याची निविदा मंजूर करून सभासदांच्या मागणीला ‘केराची टोपली’ दाखवली आहे.