नाशिक : कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विक्री ऐवजी वार्षिक भाडे तत्वावर चालविणे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. राहुल आहेर व कारखाना बचाव समितीतर्फे मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या अंतर्गत विषयांवर निर्णय झाले असताना राष्ट्रीय सहकार विकास निगमचे थकीत कर्जाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार वर्ष साजरे होत असताना, राष्ट्रीय सहकार विकास निगम संस्थेचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी कारखाना बचाव समितीचे सुनील देवरे यांनी केली आहे. सहकार व नागरी उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. वसंतदादा पाटील सह. साखर कारखाना ऊर्जित अवस्थेत येण्यासाठी उपाय योजना करिता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होती. या बैठकीत राष्ट्रीय सहकार विकास निगम संस्थेचे थकित कर्ज परतफेड, वाटाघाटी करण्यासाठी माफी मिळावी. अशी करण्यात आली. राष्ट्रीय सहकार विकास निगम, साखर विकास निधी अन्य वित्तीय संस्थांचे कर्ज घेताना विनियोग व कर्ज फेडीस झालेली अनियमितता, झालेला विलंब याप्रकरणी उच्च स्तरीय यंत्रणेद्वारे स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सुनील देवरे यांनी केली आहे.